Skip to main content
आमूला पत्रे क्रमांक ४
प्रिय आमुस,
आजच्या पत्राचा विषय खास आहे बरं का; कारण आज मी तुला तुझा जन्म कसा झाला ही गोष्ट सांगणार आहे. गोष्टी ऐकायला तर तुला खूप खूप आवडतात हे माहित आहे मला.... हो की नाही? मग आज काऊ चिऊच्या गोष्टीपेक्षा तुझीच गोष्ट ऐक ...गोष्ट आहे आमुच्या जन्माची...
सुधरुढ बाळाला जन्म घेण्यासाठी ४० आठवडे पुर्ण करावे लागतात. माझी ३९ व्या आठवड्याची मिड वाइफ अपॉयंटमेंट होती दुपारी दोन ची.... मी आणि बाबा बरोब्बर वेळेत तिथे पोहोचलो पण हॉस्पिटलच्या खाली पार्किंग मिळायला ५-६ मिनिटे गेली... आणि मी साधारण २ वाजून १० मिनिटांनी चेक अप वॉर्ड ला पोहोचले. आता ९ महिने ९ दिवस पुर्ण भरलेली मी धड भरभर चालुही शकत नव्हते. पण इकडचे नियम फार काटेकोर पाळतात आणि त्यावेळी माणुसकीही बाजूला ठेवतात हा अनुभव मला आला. फक्त १० मिनिटे उशीर झाला असला तरी ही मला पुढची अपॉयंटमेंट दिली गेली. मी त्यांना म्हटलं की दहाच मिनिटे उशीर झालाय जरा समजून घ्या ना. पण पुढच्या पेशंटना वेळ दिली आहे असे ती सरळ कोरडेपणाने सांगून निघून गेली.
अश्या ठिकाणी आपली डिलिव्हरी होणार ह्या विचारानंच कापरं भरलं होते मला... २ डिसेंबर ही माझी ड्यू डेट होती. त्यानंतर ८ डिसेंबरला म्हणजे सहा दिवस ओव्हर ड्यू झाल्यानंतरही मला चेक अपची वेळ मिळाली. पण तरीही डॉक्टर डिलिव्हरी बद्दल काही निर्णयच घेईना. इथे नैसर्गिक जन्माला फार प्राधान्य दिले जाते. भारतात बाबाच्या भावाचे म्हणजे तुझ्या सख्ख्या काकाचं लग्न होते ११ डिसेंबरला. त्यामुळे तुझा जन्म, काकाचं लग्न सगळे सुरळीत व्हावे अशी काळजी सगळ्यांनाच लागलेली. शेवटी आता ड्यू डेट उलटून १० दिवस झाले तरीही नैसर्गिक जन्म झाला नाही तर १२ डिसेंबरला सीझर करूया असं डॉकटर म्हणाले.
इथे राहणारी आपल्या ओळखीची जी एक दोन कुटुंबे होती ती नेमकी भारतात गेली होती सुट्टिसाठी. त्यामुळे चार दिवस अगोदर बाबाच सुट्टी घेऊन राहिला. १२ तारखेला हॉस्पिटलला जायचं हे जसे निश्चित ठरले तसे मी डिलिव्हरी नंतर घरगुती खायला मिळावं म्हणून तुझ्या बाबाला मऊ मुगाची खिचडी आणि चिकन सूप शिकवून ठेवलं. १० आणि ११ डिसेंबर ला तुझ्या आजीने पोस्टने पाठवलेल्या हळीवाचे मी मस्त लाडू करून ठेवले मलाच डिलिव्हरी नंतर खायला. निदान दोन तीन दिवस आम्हाला दोघांना पुरेल इतके चिकन आणि १५-२० चपात्या मी खाली बसून हळू हळू लाटुन आणि बाबाच्या मदतीने भाजून तयार करून ठेवले.
११ तारखेला रात्री मी माझी हॉस्पीटलची बॅग भरून ठेवली. आणि साधारण रात्री दहाला झोपायला गेलो. रात्रीचे दोन एक वाजले असतील बघ... माझ्या पाठीतून एक फार वाईट कळ येऊन गेली आणि मग परत साधारण १० मिनिटांनी परत तशीच जोरदार कळ.. असे सारखेच होऊ लागले पण कळा पाठीतल्या होत्या. आम्ही दोघेच हॉस्पिटलला फोन करून पहाटे ३ वाजता हॉस्पिटलला पोहोचलो. त्यांनी चेक अप केले आणि बाळ जरा तिरके फिरल्याने पाठीतून कळा येत आहेत हे सांगितले.... आधीच बाळंतपणाच्या कळा फार वाईट त्यात त्या पाठीतून येणार म्हणजे तर अजूनच वाईट हे आम्हाला कळून चुकलं. पण बाळाने हवी तशी पोझिशन न घेतल्याने अजून काही काळ ह्या कळा सोसाव्याच लागणार होत्या. त्या वेळी कोणीतरी घरचं, मोठं जवळ असावं आणि आपल्या डोक्यावर हात ठेऊन आधार द्यावा असे वाटून मला रडुच कोसळलं... हॉस्पिटलच्या त्या खोलीत फक्त मी आणि बाबा. आणि दोघांचाही अनुभव नवखाच .... त्यात पुरुष म्हणून बाबाला माझ्या बाळंत कळा कितीश्या समजणार होत्या... तरीही त्यावेळी मी चिडत आणि ओरडत असतानाही माझ्यासाठी मायेचा हात डोक्यावर ठेऊन मला धीर देत माझ्याजवळ फक्त तुझा बाबा होता... त्याक्षणी तो माझी आई, माझा मित्र, माझा देव सर्वकाही होता.... त्यादिवशी शरीराने जरी मी तुझ्या बाळंतकळा सोसल्या असल्या तरी मनाने त्या बाळंतकळा तुझा बाबाही सोसत होता....
माझ्या पाठीतून येणारया कळा मला सहनच होईना...आणि काही केल्या माझी सुटका होईना. ..पण आता मात्र माझा धीर सुटत चालला होता. आता एवढे सहन केलस तर अजून थोडा धीर काढ म्हणजे बाळाचा जन्म नैसर्गिक डिलिव्हरीने होईल असे डॉक्टर्स मधे मधे येऊन मला सांगून जात होते .
आता १८ तासापेक्षा जास्त काळ मी ह्या कळांमध्ये काढला होता ..आणि आता मात्र माझ्यातली ताकद संपली होती. पण त्याही अवस्थेत मला एक गम्मत सुचली. आमीर खानचा ३ इडियट्स नुकताच रिलिझ झाला होता. त्यातल्या बाळाच्या जन्माचा जो सीन होता त्यात वॅक्क्यूम क्लीनर च्या सक्शनने बाळाची डिलिव्हरी करतात हे अर्धवट ज्ञान मी त्या चित्रपटातून मिळवलं होते. त्यामुळे मीच काकुळतीने त्या डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर आता काही माझ्या ताकद नाही तुम्ही सीझर नाही तर नाही निदान ते सक्शन वापरून तरी माझी डिलिव्हरी करा हो... .... आता ते आठवले की खूप हसायला येतं मला पण त्यावेळी तुझ्या बाबाशिवाय कुणाचाही आधार नसलेली मी पार थकून दुसरं काय सांगणार होते बुवा...
शेवटी डॉक्टरांनी डिसिझन घेतला आणि २१ तासाच्या अथक कळानंतर माझी सुटका झाली ती तुझ्या नैसर्गिक डिलिव्हरीनेच. अर्थात गंमतीतच सांगायचे तर डॉक्टरांनी माझा सल्ला ऐकला आणि सक्शनचाच वापर केला ...एक जोरदार झटका आणि तू आमच्या आयुष्यात आलास. मी इतकी थकली होते की बाबा कित्तीवेळ मला हाक मारून सांगत होता तरी मला जागच येईना.
पण जेव्हा त्यांनी तुला उचलून माझ्या अंगावर ठेवलं ना ... तुझा तो पहिला स्पर्श... बस्स ... माझ्यात खूप मोठ्ठा बदल करून गेला ... आता मी फक्त एक बाई राहिले नव्हते ... आता पासून मी आई झाले होते... आता पासून मी आई झाले होते.......
तुझी
आई

Comments
Post a Comment