आमूला पत्रे क्रमांक २
प्रिय आमुस
वाट पहात होतास का रे आईच्या पत्राची? मला ही खूप बोलावेसे वाटत होते रे तुझ्याशी... कित्येकदा मला जेहि सांगायचे असते ना तुला ते सगळे समजवायला मी तुझ्या मनाशी असा मनाने संवाद साधला तर तुला लवकर उमगेल का?... कारण की; आपल्या मनाची नाळ जोडली होती ना रे.. तू पोटात आलास ना माझ्या; अगदी त्याही फार आधीपासून असेल बघ....
आपण दोघे असा मनाने संवाद का साधू शकतो माहित आहे कारण; माझ्या आतून तू माझ्या हृदयाचे ठोके ऐकले आहेत; आणि तुझ्या हृदयाची स्पंदने मी ऐकली आहेत... म्हणूनच तर आपल्या मनाची नाळ जोडलीय.....
तुझ्या अस्तित्वाची चाहूल जेव्हा आम्हाला लागली ना; तेव्हा कित्ती कित्ती आनंद झाला सांगू तुला..अगदी तुला आकाशात विमान दिसले की होतो ना त्यापेक्षाही खूप जास्त.... कारण् तू येणार होतास ना आमच्या आयुष्यात....आमचे प्रतिरूप... माझी आणि बाबाची लहानगी छबी ....
आनंद, उत्सुकता, नाविण्य, सगळे खुप खुप दाटून आलेले पण ..... माझे बाबा म्हणजे तुझे आजोबा खुप खुप आजारी पडले भारतात आणि त्यामुळे तुझ्या आजीला येता येईना माझ्याजवळ.... तुझ्या बाबाच्या घरूनही कुणाला येणे शक्य नव्हते... आणि काही बाही अडचणीमुळे मलाही भारतात जाणे शक्य नव्हते.... आता काय करणार बुवा ....मग मी आणि तुझ्या बाबाने ठरवले की हे शिवधनुष्य आपण एकट्यानेच पेलायचे .....
येणारा प्रत्येक दिवस आमच्यासाठी नवे काहीतरी शिकवत होता.... एक गम्मत सांगते तुला; तू १२-१५ आठवड्याचा असशील बघ माझ्या पोटात.... सोनोग्राफीला गेलो होतो आम्ही.... तू साधारण ८-१० इंचाचा झालेलास... पीटूकला... इतका चळवळत होतास ना... त्यामुळे त्या बाईला नीट सोनोग्राफीच करता येईना... तू काही केल्या शांत बसेना....मला तर सपाटून हसुच लोटले.....आणि त्यामुळे तू आणखीच चळवळ्या झालेलास..... मज्जा आलेली बघ पोटातल्या तुला स्क्रीन वर बघतांना....
घरचे जवळ असे कुणीच नव्हते आणि ऑस्ट्रेलिया मधे नवीन आल्याने इथेही फारसे ओळखीचे कोणी नव्हते... बरे तुझ्या बाबाला चहा,आम्लेट आणि फार फार तर पास्त्यशिवाय काहीच येत नाही म्हटल्यावर प्रश्नच मिटला... त्यामुळे माझे डोहाळे काही पूरवताच येईना मला.... जे असेल ते खाण्याशिवाय पर्याय नव्हता..... अश्या अवस्थेत घरून जे सांगितले जाते ना की जड उचलू नये, अरबट चरबट खाऊ नये ते बरेचदा अनदेखे करून कधी तर पिझ्झा, बर्गर खाऊनच माझे डोहाळे पुरवावे लागले ... जिभेचे चोचले म्हणून नाही तर कधी कधी पर्याय नसे म्हणून... आणि वडापाव सारखा सर्वात स्वस्त पर्याय आहे तो परदेशातला.
आपण खरेच आई होणार आहोत का असा प्रश्न मला वारंवार पडायचा.... खूप भूक आणि वाढते पोट ह्याने हे तर कळत होते की तू पोटात आहेस. पण तुझ्या अस्तित्वाची जाणीव तू मला पहिल्यांदा करून दिलीस ती तू पोटात साधारण वीस आठवडे पुर्ण केलेस तेव्हा... मला झोपेतच पोटात फुलपाखरे हुळहुळल्याचा भास झाला... पहिल्यांदा भास म्हणून दुर्लक्ष्य केले मी... पण जेव्हा हे परत परत जाणवले तेव्हा फार गम्मत वाटली मला तुझी... कशी तुझी चिमुकली पावले जाणीव करून देत आहेत मला....आणि आता वेळी-अवेळी चुळबुळ करून ही चिमुकली पावले आपले अस्तित्व दाखवत रहाणार मला हक्काने.....
आता मात्र तुझी माझी गट्टी जमली होती आणि मी वाट पाहत होते तुझ्या येण्याची.... तरीही अजून वीस आठवडे काढायचे होते फक्त मनोमन तुला बघत.... आणि तेच फार कठीण होते.... पण ती गम्मत मात्र पुढच्या पत्रात सांगीन.... तोपर्यंत धीर धरशील ना.....!
तुझी
आई

Comments
Post a Comment