आमूला पत्रे क्रमांक ३
प्रिय आमुस,
मला माहित आहे बरेच दिवस तुला पत्र लिहूच शकले नाही... थोडं बरं नव्हतं रे ...अरे आई आजारी पडली की सगळे घर आजारी पडते... आईला कधी आराम करायची सवलतच देवबाप्पा देत नाही बघ. कारण का माहित आहे तुला; आरे आपण सगळी देवबाप्पाची लेकरं ना.... आणि जिथे जिथे बाप्पा पोहूचु शकत नाही ना तिथे तिथे बाप्पा "आई" नेमतो.... मग आईला आजारी पडायला अधिकार कोण देणार? हो ना ... तरीही थोडिशी विश्रांती घेऊन मी परत तुझ्याशी खेळायला हजर....
चल आता तुला पुढची गोष्ट सांगते बरं का... तुझ्या जन्माला अजून २० आठवडे तरी अवकाश होताच... माझी नोकरीही शेवटच्या टप्प्यात होती... तुझ्या जन्माआधी माझे कॉन्ट्रॅक्ट संपणार होते आणि कॉन्ट्रॅक्टवर असल्यामुळे हवीतेव्हा सुट्टीची सवलत नव्हतीच...घरातले सगळे आटपून २५ किलोमीटर गाडी चालवत जायचे आणि यायचे... आणि वाढलेले पोट स्टेरिंग व्हील वर घट्ट चिकटत असे आणि तुला फिरायला पोटात जागा कमी पडली की तुझी चुळबुळ चालू..आरे जरा शांत हो आईला गाडी तर चालवू दे असे सांगत सांगत माझा रोजचा प्रवास चाले.... मला कामावर सगळे गमतीत म्हणत की दीड माणसाला कामावर ठेऊन एक माणसाचाच पगार द्यायचा हा तर गवर्नमेंटचा फायदाच आहे.....
आता तीस आठवडे होत आले तसे माझे प्री-नेटल क्लासेस सुरु झाले. त्या क्लासेस मध्ये माझी आणि बाबाची लहान बाळाला हाताळण्याची सगळी पूर्व तयारी करून घेतली. इथे तर सगळ्याच फॅमिली एकेकट्या राहतात ना त्यामुळे पहिल्या दिवसापासून आई वडिलांनाच लहान बच्चू हाताळावे लागते... कित्येकदा घरात मोठे असे कोणीच नसते.... त्या क्लासमधे एक बाहुली दिली जाई आणि जणू ते छोटे बाळ समजून बाथ टब मध्ये ठेऊन स्पन्जिंग करणे... नॅपी बदलणे सगळे शिकवले जाई... हे क्लासेस मॅटर्निटी वॉर्ड मधेच असल्याने नुकत्याच जन्मलेल्या बाळाचेही आवाज येत. एक- दोनदा अगदी काल परवा जन्मलेले तान्हूले घेऊन त्याची आई बाळाच्या जन्माचा अनुभव सांगायला आलेली... अश्या प्रकारे माझी आणि बाबाची तुला जपण्याची तयारी करून घेतली जात होती....
तू पोटात असतांना मला नेहमी असे वाटत होते की मला तर मुलगीच होणार... आणि इकडच्या पद्धतीप्रमाणे मी १-२ मुलीचे गुलाबी मऊ मऊ कपडे पण घेऊन ठेवले होते... आणि मग तू झालास तेव्हा गम्मत म्हणून मी तुला ते गुबगुबीत गुलाबी रंगाचे मुलीचे कपडे घरात घालून माझी मुलीची हौस पण फिटवून घेतली होती....
आता माझी सातव्या महिन्यातली ओटी भरायची होती; तुझ्या आजीने मस्त खोट्या फुलांचा डोहाळे जेवणासाठीचा सेट बनवून पाठवला होता. मी आणि बाबाने मिळून कोलंबी भात बनवला आणि मी छान साडी नेसून त्या फुलांच्या वाडीने सजून बाबानेच माझी ओटी भरली. छान फोटोही काढले. मग आम्हीच बनवलेल्या कोलंबी भातावर दोघांनी डोहाळे जेवणाचा ताव मारला.... मग एकदा इकडच्याच चार पाच जणींना जमवून माझे ऑझी बेबी शॉवर झाले... तेव्हा मात्र मन भरून आले....
आता तुझे नाव ठरवायचे होते कारण तुझा जन्म झाला की इथल्या प्रथेप्रमाणे ते फाइल साठी द्यावे लागते म्हणून. मी शोधलेली नावे तुझ्या बाबाला पसंतच पडत नव्हती... मी रोज दिवसभर डोकं खपवून चार पाच नावं बाबाला शोधून देत असे आणि तो सरळ पसंत नाही म्हणून रिजेक्ट करून टाकी. असेच बरेच दिवस चालले होते... एकदा मी "दरबारी" ऐकत बसले होते..."किनु बैरन कान भरे..." उस्तादजी अशी काही सुरेख चीझ आळवत होते की बस्स... असा काही माहोल जमून आला आणि मी पटकन बोलून गेले... ठरले तर मग... "आमीर" ठेऊया .. उस्तादजींचे नाव....आपला राजकुमार... "आमीर"......
तुझ्या जन्माआधी तुझं नावही ठरलं... नातेवाईकांसाठी न्यू बेबी कार्डही तयार झालं... हा हा म्हणता बेचाळीस आठवडेही पुर्ण होत आले...पण तुझे काही बाहेर यायचं चिन्ह दिसेना.... माझी ड्यू डेट उलटून आठ दिवस होऊन गेले... दर दोन दिवसाआड मला चेकअपला बोलावले जाई आणि सगळे नॉर्मल म्हणून घरी पाठवून दिले जाई.... आम्ही सगळेच तुझी आतुरतेने वाट पहात होतो... पण तू मात्र आता ओव्हर ड्यू बेबी होणार होतास हे नक्की....
मला तर प्रश्न पडला की बाई हा बाहेर येणार आहे की नाही? शेवटी तू कसा जन्माला आलास आणि आम्ही दोघांनी कसे पेलवलं हे बाळंतपण हे सगळे मी तुला पुढल्या पत्रात सांगीन बरं... तोपर्यंत तुला धीर धरायला हवा...
तुझी
आई

Comments
Post a Comment