आमूला पत्रे क्रमांक ६

प्रिय आमुस,

आज बरोब्बर आठ दिवसांनी तुला परत लिहायला घेतलं; म्हटलंकी आमु आत्ता कुठे वाचायला शिकतोय अश्यावेळी त्याला भरभरा पत्र लिहिली तर तो वाचेल का? मागच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे तीन दिवस हॉस्पिटल मधे राहून मला घरी सोडलं आणि आम्ही तुला तुझ्या घरी घेऊन आलो....

बाबाने पटकन घरात जाऊन भाकरी नसली तरी ब्रेडच्या तुकड्याने तुझी दृष्ट काढली आणि आपण दोघे घरात आलो... घर छान आवरून बसलं होतं....तुझ्यासाठी आणलेल्या छान छान खेळण्यांना त्यांची अशी एक जागा मिळालेली... आता आपल्या घरातली प्रत्येक वस्तू जणू काही तुलाच बघत होती... जणू तुमची एकमेकांशी खूप जुनी ओळख असावी...

आता घरी आल्यानंतर एक महत्वाचं काम होतं ते म्हणजे तुझे बारसं. तसं तर जन्म झाल्या झाल्या हॉस्पिटल रेकॉर्ड्स साठी आम्ही तुझं नाव दिलंच होतं पण बारसे झाल्याशिवाय मज्जा नव्हती... आपल्या भारतात सगळ्यांचे कान टोचायची प्रथा आहे आणि त्यामागे शास्त्रही आहे बरं का.... पण इथे अशी काहीच पद्धत नव्हती ... आणि मोठया माणसांचे ईअर पियर्सींग तेवढे असते फॅशन म्हणून... त्यामुळे मला तुझे कान टोचताच आले नाहीत मुळी...

तुला घरी आणल्यापासुनच तुझा बाबा मात्र फार काळजी घेऊ लागला तुझी.... पहिल्यांदा आम्ही तुला कापडाचे लंगोट वापरायचो कारण आम्हाला भारतातून तसंच सांगितलं जात होतं ... नाहीतर बाळाची स्किन खराब होते... आणि बाबा हे सगळं फार आवडीने करायचा.... तुला स्पन्जिंग करणं, तुला रोज तेल मालिश करणं, सगळं सगळं बाबा छान करायचा... तशी सुट्टी घेऊन तो घरीच राहिला होता; माझी आणि तुझी काळजी घ्यायला.... मला तर विश्रांतीची गरज होती आणि झोपुन रहावं लागणार होते निदान एक आठवडा तरी.... अश्या वेळी तुला थोड्या वेळाने भूक लागे नाहितर तुझं लंगोट बदलणं ह्यासाठी माझी आणि बाबाची आलटून पालटून कामाची वाटणी असे... तू मधेच उठलास आणि माझी औषधाची झोप मोडू नये म्हणून बाबा तुला खांद्यावर घेऊन तासनतास खोलीत चकरा मारत राही... त्यात तुझी मात्र छान झोप व्हायची ...आणि आम्ही करतोय जागरणाच्या वार्‍या....

खरतर आम्ही ऑस्ट्रेलियन पद्धतीप्रमाणे तुझ्यासाठी सेपरेट बेबी कॉटही विकत आणली होती पण कितीही झालं तरी आमचे भारतीय संस्कार आम्हाला तुला काही वेगळ्या खोलीत झोपू देईनात.... त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून तू आमच्या बरोबर बेड वरच झोपलास आणि तुझ्या अंगावर हात ठेऊन झोपल्याशिवाय झोपच येईना... त्यामुळे आमचे बेडचे पैसे कसे पाण्यात गेले हे तुला वेगळे सांगायला नकोच ... नाही का??

आपल्याला हॉस्पिटल मधून घरी सोडल्यानंतर हॉस्पिटलची नर्स दर २ दिवसांनी; अशी तीन ते चार वेळा घरी आली...ती माझे आणि तुझे चेक अप आणि तुझे वजन आणि बाकी रुटीनचे अप डेट ठेवायची.... हे मात्र इथे फार छान वाटलं मला....लहान बाळाला आणि आईला कसलाही त्रास होऊ नये म्हणून घरच्या घरी येऊन नर्स सगळं चेक अप करते तेही विनामुल्य तसा हॉस्पिटलचा माझा खर्च ही शून्य होता बरं का... इकडच्या देशात नागरिकांच्या हेल्थ साठी केलेली ही सोय आहे आणि इकडची लोकसंख्याही कमी आहे हे एक कारण असेल बहुधा...

तुझे बारसे करायची फार इच्छा होती पण जवळ कुणीच नव्हतं त्यामुळे आम्ही ई-बारसं हा एक मस्त कॉन्सेप्ट शोधून काढला... म्हणजे तुझ्या आजीने एक चांगला मुहुर्त ठरवला आणि त्यावेळी तिने घरात शेजारच्या आणि नातेवाईक अश्या ५-६ फॅमिलीज बोलवल्या ठाण्याच्या घरात. आम्ही ठरल्या वेळी इंटरनेट वर एकत्र भेटलो आणि त्या सगळ्यांनी तिथून पाळणा गीते म्हटली आणि मी आणि बाबाने इथे तुला तुझ्या बेबी कॉट मधे तुझे बारसं केलं...आम्ही तुझी कॉट सजवली होती... आणि “कोणी गोविंद घ्या ..कोणी गोपाळ घ्या” असे म्हणून ... मीच तुझ्या कानात नाव सांगून साखर दिली..परत एकदा तुझे नाव ठेवले गेलं.... "आमीर"....आमचा लाडका राजकुमार.... भारतातल्या नातेवाईकांनी तिकडे पेढे वाटून त्यांचा आनंद साजरा केला.. आणि आम्ही इथे तुझ्या बारश्याचे मोतिचूर लाडू आणून खाल्ले... असे झालं तुझं ई-बारसं.... आणि ते सगळ्यांनी भारतात इंटरनेट वरून पाहिलं... आहे की नाही एक वेगळीच मज्जा...

आता तू पंधरा दिवसाचा झालेलास... आणि आता लवकरच तुझे आजी आजोबाही येणार होते कारण बाबाला जास्त सुट्टी घेणंही शक्य नव्हतं ... अमू एक सांगू तुला, आम्हाला परदेशात आलेल्या मुलींना माहेरपण असं मिळतच नसतं रे... वर्षातून सणवराला किंवा असाच कधी माहेरी जाऊन यावं ही सोयच आम्हाला नाही... आणि ज्याही वेळी वर्षा- दोन वर्षानी एकदा; फार फार तर महिनाभर भारतात सुट्टी साठी गेलो तरी ती सुट्टी माहेर आणि सासर ह्यातच विभागावी लागते....प्रत्येकाला वाटतं आम्ही फारच कमी वेळ दिला पण आमची ही बाजू मात्र कधीच कळू शकत नाही... असो... तर आई येणार आणि थोडे तरी आराम मिळणार ह्या विचारानेच मी मोहरुन गेलेले बघ....

आता पुढे काय हे मी तुला आज सांगणार नाहीए... त्यासाठी तुला पुढच्या बुधवार पर्यंत थांबायचय .... तोपर्यंत आज तू तुझ्या ई-बारश्याचेच पारायण करत बस.... बरं का....

तुझी
आई




Comments