आमूला पत्रे क्रमांक १

प्रिय आमु, अरे ह्ळु ह्ळु... तू तर चार वर्षांचा झालास पण....अरे आत्ताच तर पिलूसा होतास रे तू... किती रे भरभर सरकत जाताएत रे हे दिवस... अगदी तुझ्या त्या लाडक्या मेरी गो राउन्ड सारखे... मला जरा ओंजळीत पकडायला तरी दे की रे हे क्षण....अरे तुझ्या एनर्जी बरोबर पळताना आईची दम छाक होते रे .... आणि मग तुला ह्ळूच कळत्ं की आई दमली आहे आणि शांत बसलेल्या मला तू जेव्हा जवळ येऊन विचारतोस ना, "काय झाल ग् आई" तेव्हा एकदम शंभर ह्त्तीचे बळ येते बघ मला.. असे म्हटले जाते की आई हा बाळाचा पहिला गुरु असतो... असेलही पण तू माझा गुरु आहेस हे नक्की ... माझ्या आईपणाचा.... तू माझ्या आयुष्यात येण्याआधी स्वयंपाक पण येत नव्हता बघ मला... बाबाला विचार किती बेचव स्वयंपाक व्हायचा बघ माझा.. ना पाण्याचा अंदाज ना मीठाचा... कोणी जेवायला येतय ह्या विचारानेच माझ्या पोटात गोळा यायचा. चार माणसांना जेवायला बोलावले की जेमतेम दोन माणसांना पुरेसे बनायचे आणि परत वाढू का विचारायची कोण पंचाईत असायची रे माझी. कारण एकदा वाढूनच बरचसं "संपा" ना रे.... एकदा बाबाचा मित्र यायचा होता जेवायला. मी नुकतीच ऑस्ट्रेलिया मधे आलेले. लग्न नवीनच होते त्यात देश पण नवीन म्हणजे एकूणच आनंदी आनंद होता बघ. माझा स्वयंपाक वरण भात बटाटा भाजी ह्या कॅटेगिरी मधे बसत होता म्हणजे आपला बेसिक लेवलचा रे...फार काही येत नव्हतेच.... तरी कसे बसे इथे तिथे विचारून वाचून कोंबडी तयार होऊन बसली रे पण भाकरयाच बनेनात. पीठ मळतेय भाकरया लाटतेय. पण तव्यावर भाकरी चढवायला गेले की चार तुकडे.. मला तर रडुच कोसळले रे... कश्याबाश्या २-३ तासाच्या प्रयत्नानंतर १-२ भाकरया तव्यापर्यंत तरी चढल्या... पण मी त्या भाकरीच्या पिठाला इतके छळून काढलेले की त्या तव्यावरच्या भाकरया काही केल्या फुगेनात... रूसण्या फुगण्याचा पेशन्स सुद्धा घालवून बसल्या बिचार्र्या...एकूण जेवणाचा विचकाच झालेला.... असे एक ना दोन अनेक किस्से घडले त्या १-२ वर्षात... पण तू पोटात आलास आणि सगळे बदलले बघ. आता तू मोठा झालास की जेवणाच्या काय काय फर्माईशी करशील, हक्काने मित्रांना जेवायला बोलावशील आणि मला काहीच जमले नाही तर काय वाटेल तुला. आणि मग मात्र मी शिकत गेले सगळ....अगदी मनापासून... बाबा गमतीत चिडवतो मला; आमुसाठी तू सगळे शिकलीस पण मी मात्र तुझ्या जेवणाचे प्रयोग झेललेत आणि पचवलेत... अरे तू पोटात येण्याआधी मला पेशन्स काय असतो हे सुद्धा कुठे माहित होते रे... तू शिकवलस मला आई बनायला.... आईपण जगायला .... आयुष्याकडे नव्याने बघायला..... म्हणून तर तू गुरु आहेस माझा.... तुझ्या जन्माने घडत गेलेले माझ्यातले बदल आणि तुझ्या जन्माच्या वेळी झालेल्या गमती मी तुला पुढच्या पत्रात सांगेन. बस आता थांबते... बरच आहे लिहिण्यासारखे पण हळूहळू उलगडण्यात मजा आहे बघ. तुझी आई

Comments