आमूला पत्रे क्रमांक ५
प्रिय आमुस,
ह्या आधीचं पत्र तू वाचलंस असशील एव्हाना.... त्या पत्रात तुझ्या जन्माची गोष्ट तुलाच सांगतांना मी पुन्हा एकदा ते क्षण जगले आणि आता फ्लॅशबॅक मधे जाऊन ते परत वाचतांना एक वेगळीच गम्मत वाटत होती बघ मला.
तुझा जन्म झाला आणि तुझी नाळही कापण्याआधी त्यांनी तुला माझ्या अंगावर ठेवलं ...त्याक्षणी तुही ओळखीच्या स्पर्शाने शांत झालास.... तू कसं रे पटकन ओळखलंस की हा आईचा स्पर्श आहे.... बाबाने इंडिया मधे फोन करून घरी, नातेवाईकांना कळवलं. सगळ्यांचे फोन येत होते.... एक वेगळाच जल्लोष सुरु झाला तिथे....आजी आजोबा मामा मामी काका काकी आत्या मावशी असे सगळ्याना नवं प्रमोशन मिळालं...१९ तासाहून जास्त काळ मी त्या खोलीत कळा सोसल्या होत्या पण आता मात्र त्या खोलीत एक वेगळेच चैतन्य पसरलं होतं... तुझ्या येण्यानं...
तुझा जन्म नैसर्गिक झाला, अगदी कळा वैगेरे सोसून... मला हवा होता अगदी तस्सा... ११ तारखेचे तुझ्या काकाचे लग्न, घरातली लग्नानंतरची पूजा सगळे सगळे काही सुरळीत पार पडलं....आणि मग तुझा जन्म झाला ... तू कुणाचीही अडचण होऊ न देण्यासाठीच जणू काही एवढे दिवस जन्म घ्यायला थांबलास की काय असे काहीसं वाटून गेलं मला... पण ह्या सगळ्यात माझी तब्बेत खूप बिघडली... तुझ्या जन्माच्या वेळी सगळ्या बाळंत कळा पाठीतुन आल्याने मला बसताही येईना आणि अंगात खुप अशक्तपणा आला होता... तू झाल्यावर मला तर सपाटुन भूक लागली; पण मला एवढया रात्री काय मिळणार होतं..... मला हॉस्पिटलचं जेवण दिलं गेलं.... हॉस्पिटल मधील ऑस्ट्रेलियन जेवण हि फार सकस असतं बरं का; अगदी ब्रेड, बटर, उकडलेल्या भाज्या, चिकन किंवा भाजीचे सूप, थोडा भात आणि हिरव्या पानांचं सलाड...इतर वेळी हे जेवणही मला आवडतं रे; पण बाळाला जन्म देऊन थकलेल्या मला गरम गरम वरण-भात तूप लिंबू लोणचे असे अगदी घरगुती जेवावासं वाटत होतं.... पण अश्यावेळी माझे चोचले कोण पुरवणार होतं तिथे पार साता समुद्रापार... तेव्हा मात्र फार गलबलून यायचं रे....
डॉक्टरांनी बाबाच्या हातात कात्री देऊन तुझी नाळ कापायला सांगितली... बाबाच्या आयुष्यात असा प्रसंग पहिल्यांदाच...घाबरत घाबरत त्याने नाळ कापली...तू मात्र बिनधास्त होतास.... इथे तिथे टकामका बघत होतास.... हे जग तुझ्यासाठी नवीन होतं पण तुझ्या आईच्या कुशीतून बघतांना ते तितकच उबदारही होते बरं का आमु... त्यानंतर मला पोस्ट नेटल वॉर्ड मधे हलवणार होते... तोपर्यंत रात्रीचा १ वाजून गेला होता.... बाबा माझ्या जवळच होता... माझी काळजी घेत होता.... तसाच २०-२१ तास झोप न मिळालेला.... खुप थकला होता तो... पण बाबाला हॉस्पिटलला राहता येणार नाही असे सांगितलं गेलं... त्यामुळे मला एकटीलाच तुला घेऊन हॉस्पिटलला रहायचं म्हणजे मोठे कठीण काम होतं बघ ... आधीच माझ्या तब्बेतीचं कारण होतंच आणि त्यात परत नवीन बाळाच्या शी शु च्या आणि भुकेच्या वेळा हे सगळच नवीन होतं मला...
मला रात्री २-३ तास पण झोप मिळाली नसेल बघ; आणि तू रडायला सुरुवात केलीस.... बेल वाजवून नर्सला बोलावलं मी... ती आली; पण ती ही बिचारी कदाचित अर्धवट झोप टाकून आली असावी असं वाटत होतं ... अफ्रीकन नर्स होती ती ... ती माझ्यावरच खेकसायला लागली की तुला साधी नॅपी पण बदलता येत नाही... त्यावेळी मला काळजी, माया, ममता ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून किती किलोमीटर्स दूर माझ्या देशात मी मागे सोडून आले होते ह्याची जाणीव झाली....
हातात एक छोटंसं बच्चु, त्याला कसे पकडायचं, कसे पाजायचं ह्या सगळ्या गोष्टीपासून मी कितीतरी अनभिज्ञ होते ... जरी क्लासेस मध्ये आमची तयारी करून घेतली गेली असली तरीही प्रत्यक्ष एक दोन तासाचं तान्हूलं बाळ कसे सांभाळायचं हा प्रश्न होताच की रे मला....
कित्येकदा बाळाला दूध कसं पाजावं, कसं हाताळावं असे प्रश्न नव्या आईला फार छळतात... अनेक झटापट करूनही तुला दूध पाजायचं हे न कळल्यानं माझे प्रयत्न अयशस्वीच होत... आणि त्या सगळ्या झटापटीत तू रडून थकून झोपी जायचास... अश्या वेळी मला नर्सची सारखी मदत घ्यावी लागे... त्या दिवसात माझी फार चिडचिड व्हायची आणि आपण एक असफल आई आहोत की काय ह्या भावनेने मला रडूच कोसळायचं.... माझी शारिरिक आणि मानसिक स्थिती फार कोमेजल्यासारखी झाली आणि बाबाला ते सांभाळणं थोडे कठीण होऊन बसलं म्हणुनच बाबाने तुझ्या आजीला म्हणजे माझ्या आईला ताबडतोब इथे येऊ शकाल का असे विचारलं.... तुझ्या आजारी आजोबांचे सगळे सांभाळून आजीलाही इथे माझ्यासाठी येणं ही काही सोपी गोष्ट नव्हती तरी तुझ्या ओढीने ती यायलाही तयार झाली... पण तरीही व्हिसा तिकिटे व्हायला १-२ आठवडे तरी जाणारच होते ना... आणि ह्या दोन आठवड्यात मला आणि बाबालाच हे सगळे सांभाळायचं होतं...
अजून ३-४ दिवस तरी मला हॉस्पिटलला रहावं लागणार होतं... पण एका अर्थी ते चांगलंच होतं की थोडीफार का होईना मला नर्सची मदत होत होती.... काही नर्स फार चांगल्याही होत्या मला मदतही करायच्या.... बाबाला मी शिकवून ठेवल्याप्रमाणे बाबा मऊ खिचडी आणि चिकन सूप करून सकाळ आणि संध्याकाळ घेऊन यायचा... मला तर फार भूक लागायची त्यामुळे दर २ तासानी काहीतरी खावं लागे.... अश्यावेळी मी घरचं आणि हॉस्पिटलचं असं सगळं जेवण जेवायचे...
तू १० दिवस ओव्हर ड्यू झालेलास म्हणून की काय तू जेव्हा जन्माला आलास ना तेव्हा तुझ्या चेहर्या वर नखाने ओरबाडलेल्याच्या खुणा होत्या ...तसा तू पोटात असल्यापासूनच चळवळ्या आणि महाप्रतापी होतासच हे काही तुला नव्याने सांगायला नकोच नाही का.......डॉक्टर म्हणाले की मुले असे पोटात स्वतःला नख मारतात कधीकधी... पण तू काहीतरी वेगळाच लालसर दिसत होतास भिजवून ठेवलेला शेंगदाणा कसा फुलतो ना तसा.... मला आणि बाबाला वाटलं हा असा काय आपला मुलगा ...पण जे ही आहे ते आपण छानच म्हणायचं....खरंतर आम्हाला दोघांनाही कल्पना नव्हती की नुकतेच जन्माला आलेलं बाळ साधारण काही तास असे फुलल्यासारखे लालसर दिसतं ते....पण नंतर जेव्हा तुला दोन दिवसांनी नर्सने बाथ टब मधे स्पन्जिंग केले ना; ती तुझी पहिली आंघोळ बरं का आमु; आणि मग तू जरा नॉर्मल बाळासारखा दिसायला लागलास....
आता हळू हळू आम्हाला तुझ्या बद्दल समजू लागलं होतं.... आणि ३ दिवसानंतर आता आपल्याला दोघांना घरी सोडणार होते..... म्हणजे आता खरी आणिबाणीची परिस्थिती निर्माण होणार होती पण त्याचबरोबर तुला घरी घेऊन जातांना एक वेगळीच गम्मत वाटत होती... आतापर्यंत घरात तुझ्या येण्याची चाहूल होती.... आता त्या घराला तू प्रत्यक्ष दिसणार होतास.... आपले घर तुझ्या स्वागतासाठी तयार होऊन बसलं होतं... तुझी रूम, तुझी खेळणी सगळे सगळे तुझी वाट पहात होते.... पण तू घरी आल्यानंतर माझी आणि बाबाची कशी तारांबळ झाली आणि तू एवढासा जीव आम्हाला दोघांना कसं नाचवत होतास हे सगळं तू पुढल्या पत्रात वाच बरं का.... आता पुढले पत्र मी तुला पुढल्या बुधवारी लिहिन तोपर्यंत तू आजच्या पत्राची मजा घे....
तुझी
आई

Comments
Post a Comment