आमूला पत्रे क्रमांक ८
प्रिय आमुस,
आजच्या पत्रात मी तुला तुझ्या पहिल्या तीन महिन्याच्या घटना सांगणार आहे बरं का... तसा तू एक गुणी बाळ होतास म्हणजे मस्तीखोर नव्हतास असं काही मी म्हटलेलं नाहीए बरं का? मागच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे माझे आई बाबा तीन महिन्यासाठी आले होते आपल्याकडे.
आई बाबा आले आणि मलाही तुझ्या सारखेच लहान व्हावंसं वाटायला लागलं... अचानक खूप थकवा आला आणि झोपून रहावं आणि आई कडून सगळे लाड पुरवून घ्यावेत असे होऊन गेलं होतं... कदाचित मनाबरोबर शरीरही शिथील होत चाललं होतं.
आईने तिच्या सोबत खूप छान वस्तू आणल्या होत्या गवल्याची खीर, मेथीचे लाडू, हळीवचे लाडू, डिंकाचे लाडू ...वा मस्त... खरतर भारतात असतांना मला घरगुती खाण्याचं कधी अप्रूप वाटलच नाही बघ; पण आता मात्र त्याच घरगुती वस्तू फार जिव्हाळ्याच्या झाल्या होत्या. आईच्या हातचं आयतं गरम गरम खायला मिळत होतं; एकंदरीतच मीही चांगलं बाळसं घेत होते तुझ्या बरोबर... इथे अंग मालिश करायला बाळ बाळंतीनीसाठी सुईण मिळतच नाही म्हटल्यामुळे मालिश चे काम तुझ्या आजीवरच आलेले. तुझी आजी 3 महिनेच रहाणार होती त्यामुळे मला तुझी मालिश पण शिकून घेणे भागच होतं... पण तुला मालिश केल्यावर मात्र तुला फार चांगली झोप यायची. आणि मलाही थोडा निवांतपणा मिळायचा.
तुझ्या आजीने तुझा बाळंतविडा आणला होता हाताने बनवून... आम्ही तुला ते झबलं टोपरं घरात घालून मिरवायचो...अगदी बाहुल्यासारखे.. तसाच तुझ्या बाबांच्या आत्या आजीने स्वतः हाताने बनवून डिंकाचे लाडू, खीरीसाठी गवल्या आणि तुला हाताने बाळंतविडा करून पाठवला. तिने एक छोटासा स्वेटर तुझ्यासाठी करून पाठवला.... अमू ही गोष्ट इतकी कौतुकाने तुला सांगतेय कारण त्यावेळी बाबांच्या त्या आत्या आजीचे म्हणजे तुझ्या पणजी आजीचे वय नव्वदीच्या घरात होते. आणि त्या वयातही माझ्यासाठी तिने स्वतः बनवून हे सगळं पाठवून दिलं ही गोष्ट मात्र माझ्या मनात कायमची कोरली गेली..... दुसर्याआसाठी निरपेक्ष भावनेनं केलं तर ते परमेश्वराकडे पोहोचतं ही गोष्ट मी तिच्या कडुनच शिकले... आज तुझी ती पणजी आजी ह्या जगात नाही पण तिने बनवून पाठवलेला तो स्वेटर मात्र मी जपून ठेवलाय...तिची आठवण म्हणून.... कदाचित तुझ्या मुलांना देईन तो....
आता तू एक महिन्याचा झालेलास आणि आम्ही तुझा एक महिन्याचा वाढदिवस केला... छोटासा केक घरात करून... असे पहिल्या वर्षात १२ वाढदिवस केले हो अमू तुझे हौसेने.... आजी- आजोबांबरोबर तुझे कोड कौतुक चालूच होते... आता तू हळू हळू हुंकारूही लागला होतास... प्रत्येक शब्दाला प्रतिसाद द्यायचास तेव्हा गम्मत वाटायची आम्हाला.
माझ्या नोकरीचे कॉन्ट्रॅक्ट तुझ्या जन्माआधी संपलं होतं त्यामुळे माझ्याकडे नोकरीच नव्हती... बाबाची एकट्याची नोकरी,त्यात नवीन घराचे लोन म्हणून मला फारच काळजी लागली होती...तुझ्या जन्मानंतर तुला सगळ्या नातेवाईकांना दाखवण्यासाठी मला भारतात न्यायचं होतं त्यामुळे घराचे लोनचे हफ्ते, भारताचे आपल्या तिघांचे तिकिट आणि रहायचा खर्च हे सगळे फक्त बाबाच्या एकट्या पगारात कसे होणार...म्हणून मला काही केल्या एखादी नोकरी बघणंच भाग होतं...बाबा म्हणाला की अगं एवढ्यात कशाला दगदग करतेस... पण भारतात जायची ओढ स्वस्थ बसू देईना.... आजी आजोबा ३ महिनेच राहणार होते आणि मला तुझ्या साठी चाइल्ड केअर ही मिळालं नव्हतं. मी दिसेल त्या पार्ट टाइम नोकर्याा अप्लाय करत गेले... पण ऑफीसचे पार्ट टाइम असले तरी ९ ते ५ मधीलच तास आणि दिवस निवडावे लागणार होते...आणि बाबाचीही त्याच वेळेतली नोकरी असल्यानं शक्यच नव्हते....म्हणून मी प्रसंगी एक अगदी साधीशी नोकरी पकडली.. ब्रेड सूपरमार्केटला डिलिव्हरी करायची...... माझ्या शिक्षणाचा दूर दूर पर्यंत संबंध नसलेली......नोकरी स्वीकारतांना दुःख झालं खरं पण तुझ्या भुकेच्या आणि बाबाच्या नोकरीच्या वेळा संभाळून मला थोडे डॉलर्स सुटले तर बरंच होतं... त्यासाठी मला पहाटे ३ ला घरातून निघावं लागे आणि ४ तासाचे काम आटपून मी साधारण सकाळी ८ ला परत घरी येई.
मी सकाळी पहाटे कामावर निघण्याआधी तुला बरोब्बर चाहूल लागायची मी जवळ नसल्याची; आणि तू उठून बसायचास दुधासाठी...अशा वेळी नव्या नोकरीला वेळेवर पोहोचतांना फार तारांबळ व्हायची बघ माझी...काही दिवस आजी घरी असल्याने मी घरी आले की जरा झोप काढता यायची आणि आजी तुला सांभाळायची... पण आजीचे तर तीन महिने संपत आले होते आणि आता साधारण १५ एक दिवसच उरले होते... आजी गेल्यानंतर मी माझी नोकरी, आणि तू कसे झेपवणार असा एक मोठा प्रश्नच होता... पण वेळोवेळी सगळी कोडी सुटत गेली बघ.... आपण मनुष्यप्राणी उगीचच चिंता करत असतो पण परमेश्वरावर भार सोपवला की सगळी उत्तरे आपोआप सुटत जातात.
तू साधारण एक महिन्याचा होतास तेव्हा आम्ही एक अवलिया ट्रिप केली होती तुला घेऊन. बाबाने सिड्नीला एक छोटी चक्कर टाकून आजी आजोबांना ऑपेरा हाउस दाखवूया असं ठरवलं. आपण सगळे सकाळी ८ ला निघालो ते दुसर्या दिवशी पहाटे २-३ ला घरी आलो असू... काय दमलो होतो आपण सगळेच...मस्त मजा आली होती..... आज त्या आठवणी मनाला सुखद करतात...एवढ्या लहान बाळाला घेऊन असे उद्योग कोणी करत नाही पण आम्ही केले आणि मुलं अशीच शिकत जातात की ... आणि तसा तुही आम्हाला त्रास नाही हो दिलास हे मोठे नवल बघ...
आता आजी आजोबांचे तीन महिने संपत आले तुही साडेतीन महिन्याचा झालेलास. त्यांना एअरपोर्ट वर सोडून आलो आणि परतत असतांना आता आपण एकटीने नोकरी घर कसं झेपवायचं हा प्रश्न सोडवत बसले होते... सगळे एकंदरीतच कठीण होतं पण अशक्य नव्हतं बरं का अमू.... आणि तेव्हाची परिस्थिती आनंदाने झेपवली म्हणुनच आज तुला हे समाधानाने लिहू शकले... पण सगळेच दिवस सारखे नसतात... हे ही दिवस पालटले आणि अश्या अजून गमती जमती आहेत बरं का माझ्याकडे तुला सांगायला... पण त्या मात्र पुढल्या बुधवारी.... वाट पहा...
तुझी
आई

Comments
Post a Comment