आमूला पत्रे क्रमांक ७

प्रिय आमुस,

मी एका १५ दिवसाच्या बाळाची गोष्ट लिहितेय आणि आता ते बाळ चार वर्षाचं झालय….आणि बरं का आमू; मी लिहिलेलं ते सगळं वाचतय आणि त्यातून त्याला त्याच्या जन्मापासुनचं एक जग उलगडतय…..ही कल्पना किती मजेशीर आहे की नाही....

जसं मी तुला मागच्या पत्रात सांगितलं ना की; मी खूप खुशीत आले होते …. माझे आई बाबा येणार होते.... म्हणजे तुझे आजी-आजोबा …. अमू आई वडीलांसाठी मूल लहान असो की मोठं ते नेहमीच त्यांचे लहान बाळच असते बरं का... तसे मुलासाठी पण आई बाबा हे कुठल्याही वयात असलो तरी आपल्याला संभाळून घेणारे आई बाबाच असतात….ती अशी एक देणगी असते जिथे खोटे आणि दिखाऊ वागायची काही गरज नाही बघ ….अगदी बिनधास्त आपल्या मनात येईल ते वागावं, हट्ट करावेत आणि ते आई बाबांनी पुर्ण करावेत …. आता तुला हे विशेष सांगायची मला गरजच नाहीए खरतर; कारण तूला हे सगळं नीट ठाऊक आहे....म्हणूनच तर तुझे सगळे हट्ट माझ्या आणि बाबा समोर जोरदार चालू असतात …हो की नाही.....आणि आम्हालाही त्याची गम्मतच वाटते बरं का …. का सांगू; कारण आम्ही पण तेच केलय आमच्या लहानपणी …तुझ्या भूमिकेत असतांनाही आम्ही फार चांगले कलाकार होतो बरं …आता आमची भूमिका बदललीय एवढाच काय तो फरक….

आता तू १५-२० दिवसाचा झाला होतास …मलाही हळू हळू तुझे सगळे जमायला लागलेलं….तुझ्या भुकेच्या वेळा सांभाळणं, शी-शु ओळखणं हे सगळं कळायला लागलं …म्हणजे थोडक्यात मी माझ्या आईच्या भूमिकेत शिरायला लागले होते …आणि हा नवा रोल मला नीट समजूही लागला होता….. मजा वाटायची रे मला ….फार काही नाही खरतर काहीच वर्षापूर्वी पर्यंत बाहूलीशी खेळणारी मी तुझ्यासारखी छोटी बाहुली हातात आल्यावर एक जबाबदारीने वागायला लागलेले बघ ….

आता मी घरात कामे करायला सुरवात केली होती….बाबाची सुट्टी संपली होती त्यामुळे तो कामावर जाऊ लागला पण आता २-४ दिवसात आजी आजोबा येणार म्हणून काही हरकत नव्हती …नाहीतर तू आणि मी घरात एकटेच ….कोणाला हाक मारावी म्हणायची पण सोय नाही …. आपल्या शेजारपाजारच्या गोर्‍या शेजार्‍यानी येता जाता माझी डीलिव्हरी झाली का एवढं तरी बाबाला विचारून घेतलं होतं हीच खूप मोठ्ठी गोष्ट होती खरतर ….कामावरून घरी आल्यावर बाबा तुला सांभाळायचा मी घर काम आटपून घेत होते …. अश्यावेळी आदल्या संध्याकाळीच मी माझे दुसर्‍या दिवशीचं सगळं खाणं बनवून फ्रिज मधे ठेऊन द्यायचे म्हणजे मी एकटी असतांना पटकन ते गरम करून खायला बरं आणि तुला कोणी ना कोणी सारखे जवळ हवंच असायचं...

आजी आजोबा मुंबईहून विमानात बसले आणि माझ्या मनाने अश्शी काय भरारी घेतली तुला काय सांगू …. आता माझे आई बाबा येणार म्हणजे मला ही लहान व्हायला मिळणार होतं …. हो की नाही?? साधारण १८ ते २० तासाचा विमानाचा प्रवास करून ते येणार म्हणजे थकलेलेच असणार ह्यात काहीच वाद नव्हता …. मी आणि बाबाने तुला झोपवून सगळं घराचं वॅक्युम करून आजी आजोबांची एक खोली तयार करून ठेवलेली …. आणि माझे बाबा पहिल्यांदाच मी बनवलेला स्वयंपाक जेवणार म्हणून मी मस्त घरगुती जेवण करून ठेवलं …. अगदी घरगुती मराठमोळा मेनु … कोबीची भाजी, मटकीची उसळ, डाळीची आमटी, पोळ्या, भात आणि कोशंबीर …. आज माझ्या बाबांकडून मला शाब्बासकी हवी होती नं …. कारण लग्नाआधी मला काहीच यायचं नाही रे …. मी फक्त चहा आणि मॅगी ह्यापेक्षा मोठी उडी मारलीच नव्हती कधी; हे तर मी तुला आपल्या पहिल्या पत्रात पण सांगितलं ….

आता सिड्नी एअरपोर्टला आजी आजोबांचं विमान लॅंड झालं … हे सगळं आम्हाला ऑनलाइन कळत होतं … आता त्यांचं २ तासात परत कॅनबेरा साठी यायचे विमान होते…. आपण सगळेच एरपोर्टला जायच्या तयारीत होतो ….. आणि एवढ्यात फोन आला …. तुझी आजी बोलत होती सिड्नी एअरपोर्ट वरून …. म्हणाली आमचे कनेक्टिंग फ्लाइट चुकलय कस्टम मुळे …. आता अजून २ तासानी हे लोक दुसर्‍या विमानात आमची सोय करून देताहेत ….हे ऐकलं आणि किती हिरमुस झाला रे माझा …. आता अजून ४ तास तरी मला वाट बघायला लागणार होती नं …. दुपारचं मस्त गरम गरम जेवण तयार करून वाट पहात होते ना ….

आता तू, मी आणि बाबा एअरपोर्टला जायला निघालो तुझ्या बेबी चेअर मधे बसवून तुला गाडीत ठेवलं आणि तू ही मस्त जागा होतास बरं का आमु …. अगदी टका मका बघत होतास सगळं … काय कळत होतं रे तुला माहित नाही मला …..पण एकंदरीत सगळे छान छान वाटत होतं हे नक्की …. मोठ्या एअरपोर्टच्या काचांमधून मी विमान लॅंड होतांना पहिले …. इथे अगदी आतपर्यंत जाता येते ना एअरपोर्टला …. जास्त गर्दी नाहीए म्हणून असेल कदाचित …. आणि स्क्रीन वर विमान लॅंडेड असे दिसलं आता फक्त १० मिनिटात आई बाबा दिसणार ह्या विचारानेच मी तर पार भुरकटले रे …. बाबाला मात्र गालातल्या गालात हसू येत होतं माझी एकंदरीतच तारांबळ बघून …. आणि तू मस्त बसला होतास माझ्या हातातल्या कॅरी पाउच मधे छोटा कांगारू बनून …

आणि दार उघडलं सगळे पॅसेंजर भरभर बाहेर येताहेत आता मात्र माझा जीवच राहीना …. बस बस बस… आता आई दिसू दे मला …. आता नाही धीर धरवत माझा …. आणि आई दिसली एकदाची …. हुश्य… तिच्या मागून हळू हळू चालत येणारे माझे बाबा … नुकतेच आजारातून उठलेले …. आणि तुझ्या ओढीने धावत आलेले.. तुला सांगू त्यावेळी तुझ्या आणि माझ्यात काहीच फरक नव्हता बघ…. आरे अगदी तान्हुल्या बाळाला ही आपली आई किंवा तिचा आवाज गर्दीतूनही पटकन ओळखता येतो ना तसाच मला ही १ वर्षांनी आई दिसल्यावर झालं बघ …. काय करू आणि काय नको असे होऊन गेले बघ ….


आजी आजोबांनाही तसाच काहीसं झालेलं…. आपला छोटा नातू बघता त्यांनाही खूप खूप गहिवरून आलं …. ही एअरपोर्ट एक अशी जागा आहे ना की तिथे गेले की हमखास डोळ्यात पाणी येतं बघ …. फरक इतकाच की कधी भेटीचे आनंदाश्रू असतात तर कधी विरहाचे दुखाःश्रू असतात …..

काय रे अमू तुझ्या आईची उडालेली तारांबळ वाचून तुला मजा आली असेल नाही का….पण आता मी ह्याच पत्राचा आनंद घेत इथेच थांबते आज….पुढल्या बुधवारचा खजिना घेऊन लवकर येते …बर का ….

तुझी
आई

Comments