आमूला पत्रे क्रमांक ९
एक छोटं बाळ घरात असणं ही जितकी जबाबदारीची गोष्ट तितकीच एक क्षण विरंगुळ्याचीही गोष्ट असते बरं का.... आपल्या धकाधकीच्या जिवनापेक्षा बाळाचं निष्पाप जग किती वेगळं आहे हे फक्त काही क्षण त्याच्या निरागस चेहर्याकडे बघत राहिलो तरी कळतं.... तू ही आता साडे तीन महिन्याचा झालेलास आणि तुझा सहवास ही एक खूप छान गोष्ट होती माझ्या आयुष्यात चालू असलेली...
तीन साडेतीन महिन्याचं बाळ दूध पीतांना, स्पर्शातून आईला परखत असतं बरे का.... आईच्या चेहर्यावर झालेले सूक्ष्म बदल सुद्धा बाळ नीट टिपत असतं....आई बाबांना एअरपोर्टला सोडून आले आणि घरी येऊन मला रडूच कोसळलं... आई होती तोपर्यंत एक मानसिक आधार वाटत होता... आता काही कोड कौतुकाचे दिवस राहिले नाहीत आणि जबाबदारीचे दिवस आले हे कळून चुकलं... पण मला असं उदास झालेलं तुला ४ महिन्याच्या मुलाला जाणवलं आणि तुही त्यावेळी न रडता शांत माझ्या जवळ बसून राहिलास.
आजी आजोबांचा तीन महिने सहवास तुझ्या ओळखीचा झाला होता.... आजी तुझ्याशी बोलायची तेव्हा तू हुंकारही द्यायचास त्यामुळेच की काय आजी आजोबा आज घरात दिसत नाहीत हे तुलाही जाणवलं होतं... २० तासाचा प्रवास करून आजी भारतात पोहोचल्यावर तिने जेव्हा सुखरूप पोहोचल्याचा फोन केला तेव्हा मी फोन तुझ्या कानाला लावला आणि तू ही आजीचा आवाज ऐकून हुंकारु लागलास.... आजीचा आवाज ऐकताना तुला हिमटी यायला लागली... साडे तीन महिन्याच्या तुला काय समजत होतं माहित नाही... पण काहीतरी कळत नक्कीच होतं एवढे मात्र खरं....
दुसर्याच दिवशी पासून पहाटे 3 वाजता कामावर निघण्याआधी मी तुझी आणि बाबाच्या डब्याची तयारी आटोपून ठेवली.. आता कामावर धावत पळत पोहोचायचे आणि चार तासाचे फार धावपळीचे काम असे माझे... पार थकून जायला व्हायचं. त्यात परत झोपही अपुरी झालेली.... ८ वाजता कामावरून सुटले की तुला गाडीत घालायचं आणि बाबाला साधारण ४० किलोमीटर गाडीने कामावर सोडून यायचं. मग घरी परत ४० किलोमीटर गाडी चालवत यायचं ... जेवणाची तयारी, तुझी मालिश आंघोळ, सगळे आटोपून जेमतेम थोडा वेळ झोप मिळाली तर मिळाली आणि परत बाबाला ४० किलोमीटर गाडी चालवत घ्यायला जायचं... आणि परत आपली तिघांची वरात घरी असा दिनक्रम झाला होता माझा... त्यावेळी आपल्याकडे एकच गाडी होती आणि दिवस भराच्या कामाला मला ती लागत असे. परत बसची सोय इथे फारशी चांगली नसल्याने गाडी शिवाय पर्याय नसायचा. इथे घरात गाडी असणं ही चैन नसून गरज आहे कारण साधी कोथंबीर जरी आणायची झाली तरी किमान ५-१० किलोमीटर तरी दूर असलेल्या सुपर मार्केट शिवाय पर्याय नाही. इंडियन शॉप सुध्हा तेव्हा २५ किलोमीटर तरी लांब होते आणि म्हणून महिन्यातून दोन वेळा गाडीने जायचे आणि सगळे समान भरून ठेवायचे हा एकच पर्याय... असे साधारण तीन महिने तरी मी रेटले असतील बघ त्या नोकरीत ... उसंत म्हणून मिळत नसे... नव्या बाळाच्या खूप तरा सांभाळायच्या असतात बरे का... आणि नव्या पालकांसाठी तर ते आव्हांनच असतं नेहमी.
त्यातच तुझी तिसर्या आणि सहाव्या महिन्याची इंजेक्षन्स झाली मग काय रात्रभर तुला मांडीवर घेऊन बसायचो आळीपाळीने मी आणि बाबा... इंजेक्षन्समुळे तुझा हात दुखायचा, अंग गरम व्हायचे तुझी किरकिर व्हायची पण तसाच तुला जोजवत आमच्या रात्री मात्र जागायच्या पण नव्या नोकरीत सुट्टी कशी मिळणार त्यामुळे तसच आटपून पहाटे चारला कामावर हजर व्हायचे..... त्यात भरीस भर म्हणून की काय ऑस्ट्रेलियाचं वातावरण अतिशय कोरडे असल्याने बर्याच भारतीय वंशाच्या मुलांना बेबी एक्ज़िमाचा त्रास होतो... तसा तो तुलाही झाला... माइनस टेम्परेचरची थंडी सगळं अंग गोठवून टाकणारी....तुझ्या हातात आम्ही थंडीचे जे सॉक्स घालायचो त्यानेच तू चेहर्यावर कानाजवळ खाजवून खाजवून फार वाईट जखमा केलेल्यास आणि आम्ही डॉकटर सांग तील ती औषधे करत होतो पण काही केल्या तुझी स्किन बरी होईना... शेवटी तू खाजवू नयेस म्हणून ४-५ महिन्याच्या बाळाचे हात बांधून ठेवावे लागत... त्यामुळे तुला काही करता येत नसे...उपडी वळणे, रांगणे काही काही करता येत नसे....त्याचे आम्हाला फार वाईट वाटायचे पण दुसरा काही पर्याय ही दिसत नव्हता.... त्यात कधी आजीने सांगितल्या प्रमाणे तुळशीच्या पानांचा रस लावणे कधी निम पावडर लावणे असे घरगुती उपाय ही केले पण स्किन चा एक मोठा पॅच खराबच होऊन गेला होता.... काय करावे काही कळेना.असे दोन एक महिने तरी चालू होते... तुझे हात मोकळे सोडले कि तु खाजवून आणखी रक्त काढून ठेवायचास. शेवटी वेगवेगळी औषधे वापरता वापरता डॉकटरने एकदा स्टेरोईड वापरायचा सल्ला दिला आणि फरक पडत गेला ...हळू हळू तुझी स्किन परत नीट होत गेली आणि असे करत तू साधारण सहा महिन्याचा होईपर्यंत तुझा बेबी एक्ज़िमाही बरा झाला. आणि तुझे बांधलेले हातही मोकळे झाले
सहा महिने तुझे हात बांधून ठेवायला लागल्याने तुला उपडी वळणे, रांगणे, काहीच सहा महिने करताच आले नाही... मला इतर मुलांची प्रगती बघून फार वाईट वाटे आणि तू हे सगळे करणार तरी आहेस का असा प्रश्नच पडे... आम्ही अधून मधून लॉंग ड्राइवला जायचो बाबाच्या फोटोग्रफीच्या निमित्ताने ....तसाच एकदा बेटमन्स बे ला गेलो असता अचानक तू उपदी वळलास... आम्हाला फार मजा वाटली ... त्यानंतेर परत काही दिवसानी बेटमन्स बे ला गेलो तेव्हा तू एक दोन पावले रांगलास ही... त्यामुळे तुझी प्रत्येक प्रगती बेटमन्स बे ला येऊन होते असे आम्ही गमतीत म्हणायचो... आणि ह्याला चालायची प्राक्टिस पण बेटमन्स बे ला येऊनच देऊया अस मी आणि बाबा गमतीत म्हणायचो...
तुझ्या सहा महिन्याचा वाढदिवस आम्ही मस्त साजरा केला ... अगदी घरातच ... पण तुझ्या खेळण्यातले भू भू हत्ती वाघोबा सगळ्यांच्या मधे तुला बसवून केक कापून.... आणि त्याच दिवशी माझा नाचाचाही एक कार्यक्रम होता....गाणं होतं “मधुबन मे राधिका नाचे रे ”... तुझे विशेष कौतुक म्हणजे मी तुला संभाळून जेव्हा घरात प्रॅक्टीस करायचे तेव्हा तू शांतपणे एकटा खेळत रहायचास त्यामुळेच मला माझा रियझ करता येत होता.... पण कार्यक्रमाच्या दिवशी मात्र तू फार रडत होतास.... तू असाच रडत राहिलास तर मी कसे नाचू शकीन आणि बाबाला एकट्याला कसे सांभाळता येईल एवढ्या मोठ्या हॉल मधे; अशी मला काळजीच लागून राहिली होती...पण जेव्हा माझा नाच सुरु झाला आणि तुझ्या कानावर ते गाणे पडले तसा तू एकदम शांत बसलास.... रियाझाच्या वेळी ते गाणे तुझ्या ओळखीचे झाले होते आणि त्याचमुळे जसे मधुबन मे राधिका च्या सुरुवातीचा हमीर मधला आलाप तू ऐकलास तशी तू आई जवळ आहे अशी समजूत करून घेतलीस आणि शांत झालास.... माझा कार्यक्रम छान पार पडला ... सहा महिन्याच्या बाळ असून मी नाचले म्हणून खूप कौतुक झालं पण ते माझ्या पेक्षा जास्त तुझ्याच समजुतदारीचं होतं बरं का अमू...
तुझी
आई

Comments
Post a Comment