आमूला पत्रे क्रमांक ११

प्रिय आमुस, तुझा सहा महिने ते एक वर्षाचा काळ फार सुंदर होता आमच्या आयुष्यातला... तुझे हळू हळू रांगणे, तुला दुधापेक्षा काहीतरी वेगळे खाण्याची आवड होणे ह्या सगळ्याच गोष्टी बघतांना एक गम्मत यायची बघ. पण तुम्ही छोटी बाळं किती भरभर मोठी होत जाता रे... आता एवढासा म्हणेपर्यंत वर्षाचा होत पण आलेलास तू... तू जसा सात एक महिन्याचा झालास तसे तुला नुसते दूध किंवा खीमट मुळी आवडेनाच. मग तुला आमच्या बरोबर जेवायला बसायचे असायचे. आम्ही तुला इकडच्या प्रथेप्रमाणे हाय-चेअर घेऊन आलो आणि मग तू त्यात बसून कधी उकडलेले गाजर, उकडलेला बटाटा खाऊ लागलास. तसे दात जरी आलेले नसले तरी तुला आमच्या सारखे जेवायची घाईच होऊन गेलेली. आणि मग तू त्यासाठी हट्ट करायचास. एकदा तुला सुपर मार्केट मधे घरचे सामान आणायला मी घेऊन गेले... तू ट्रॉलीमधे बसून इकडचे तिकडचे पदार्थ बघत होतास. त्यात तुला मस्त लाल चुटूक टोमॅटो आणि सफरचंद दिसले. तू हट्टच धरून बसलास की मला आत्ताच्या आत्ता ते दे... तू काही केल्या ऐकेना आणि सगळे माझ्या कडेच बघायला लागले..अश्या वेळी तुला चार चौघात एक लगवता पण येईना... मग काय कशी बशी सावरून सटकले मी तिथून... आणि घरी येऊन तुझ्या हातात सफरचंदाची एक छोटी भेस दिली. तसे तूला हातात धरून चोखायला मजा येऊ लागली. मुले आई बाबांची कशी मस्त पंचाईत करून ठेवतात ना चारचौघात. तू आता वर्षाचा होत आलेलास आणि मी आणि बाबा मस्त ६ आठवड्याची सुट्टी घेऊन इंडियाला जायला निघालो. तसे तिकिट तर ३ महिने अगोदरच काढलेले रे पण थारा कुठे होता आम्हाला. तू तर पहिल्यांदाच चाललेलास. त्यामुळे खूप तयारी करावी लागली. तुला पटकन अन्न पाणी बाधू नये आणि आमची सुट्टी तुझ्या आजारपणातच जाऊ नये म्हणून इथूनच मी बेबी फुड आणि मिल्क पाउडर घेऊन ठेवलेली. भारताच्या तुलनेत बाहेरच्या देशात बेबी फुड मुबलक आणि विविध प्रकारात मिळते. कारण आम्ही भारतात एक महिना पुरेल असे बेबी फुड कुठे मिळेल हे शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण असे पर्याय निदान त्या वेळी तरी उपलब्ध नव्हते... आता असतील ही कदाचित. तुझी सगळी औषधे मला इथूनच न्यावी लागली होती. म्हणजे अचानक सर्दी खोकला ताप आल्यास औषध बदलायला नको.. खूप छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात बुआ तुम्ही भारताबाहेर जन्मलेल्या मुलांच्या... कारण आमच्या लहानपणी तर आम्ही पाणी उकळून सुध्हा प्यायचो नाही. माझे तर बालपण डोंबिवली आणि ठाण्याचे... तरी काही सुद्धा व्हायचे नाही हो आम्हाला... रस्त्यावरचा बर्फाचा गोळा, चिंचा बडीशेपेची झाडे, हे तर रोजचे सोबती असायचे आमचे. बेट लावायचो आम्ही आणि जिंकलो की आठाण्याचा बर्फाचा गोळा मिळवायचो... कसली धमाल असायची बघ...आणि कॉलेजला गेल्यावर तर वडापाव, पाणी पुरी, पाव भजी, मिसळ, टपरीवरचा कटिंग..... वा वा वा वा..... आम्हाला कधी पिझ्या पास्त्याचे आकर्षण नव्हतंच मुळी आणि आजही नाही.... तुलाही ह्या छोट्या छोट्या गोष्टीत गम्मत गवसते का बघ अमू... आता तर जग खूप बदलय रे.... आमच्या आजीचं जग आणि आमचं जग ह्यातही जमीन आस्मानाचा फरक होता असं म्हणायची ती बरेचदा... तेव्हा तेवढं कळलं नव्हतं बघ पण आता समजतय जग कसं भरभर बदलते ते... पण तुझंही हे छोटं जग फार सुंदर आणि निष्पाप आहे बरे का अमू.... छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेलं... आणि त्यातल्या बाकीच्या गोष्टी नंतर साठी राखून ठेवते. तुझी आई

Comments