आमूला पत्रे क्रमांक ११
प्रिय आमुस, तुझा सहा महिने ते एक वर्षाचा काळ फार सुंदर होता आमच्या आयुष्यातला... तुझे हळू हळू रांगणे, तुला दुधापेक्षा काहीतरी वेगळे खाण्याची आवड होणे ह्या सगळ्याच गोष्टी बघतांना एक गम्मत यायची बघ. पण तुम्ही छोटी बाळं किती भरभर मोठी होत जाता रे... आता एवढासा म्हणेपर्यंत वर्षाचा होत पण आलेलास तू... तू जसा सात एक महिन्याचा झालास तसे तुला नुसते दूध किंवा खीमट मुळी आवडेनाच. मग तुला आमच्या बरोबर जेवायला बसायचे असायचे. आम्ही तुला इकडच्या प्रथेप्रमाणे हाय-चेअर घेऊन आलो आणि मग तू त्यात बसून कधी उकडलेले गाजर, उकडलेला बटाटा खाऊ लागलास. तसे दात जरी आलेले नसले तरी तुला आमच्या सारखे जेवायची घाईच होऊन गेलेली. आणि मग तू त्यासाठी हट्ट करायचास. एकदा तुला सुपर मार्केट मधे घरचे सामान आणायला मी घेऊन गेले... तू ट्रॉलीमधे बसून इकडचे तिकडचे पदार्थ बघत होतास. त्यात तुला मस्त लाल चुटूक टोमॅटो आणि सफरचंद दिसले. तू हट्टच धरून बसलास की मला आत्ताच्या आत्ता ते दे... तू काही केल्या ऐकेना आणि सगळे माझ्या कडेच बघायला लागले..अश्या वेळी तुला चार चौघात एक लगवता पण येईना....