करोना आणि आम्ही ऑस्ट्रेलियन
माझं घर आहे ऑस्ट्रेलियाच्या राजधानीमध्ये म्हणजेच कॅनबेरा मध्ये. मी शाळेत लायब्ररीअन आहे आणि वीकेंडला कत्थक डान्सस्कुल चालवते. कम्युनिटी रेडिओवर मी रेडिओ जॉकी म्हणूनही काम करते. दोन दहा वर्षाच्या आतील मुलांची आई पण आहे. त्यामुळे माझा दिवस हा नेहमीच विमानाचे पंख लावल्यासारखा.
करोनाचा झटका खरंतर पचनी पडणारा नव्हताच माझ्या. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच स्कॉट मॉरिसनच्या ऑस्ट्रेलियन सरकारने दक्षता घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा आम्हाला ऑस्ट्रेलियनना ती बंधनं पचणारी नव्हतीच. तशीही बंधनं कोणाला हवी असतात. आम्ही लॉक डाउनच्या पहिल्या फेज मध्ये होतो. आमच्या शाळा पुपील फ्री करण्यात आल्या. म्हणजे शाळेत मुलांना पाठवायचं कि नाही हा निर्णय पालकांचा. पण शाळा चालू ठेवल्या होत्या प्रत्येक इसेन्शिल वर्कर साठी. आणि जो पगार घेतो आणि स्वतःचा उदर्निवाह करतो तो प्रत्येक जण इसेन्शिअल कामाच्या यादीतला.
पहिल्यांदा आम्हाला मॉरिसन सरकारचा खूप राग आलेला पण आता त्याच्या गोष्टी काहीप्रमाणात पटल्याहि. कोविड१९ चे चटके जगाच्या इकॉनॉमीला बसण्या आधीच ऑक्टोबर १९ पासून ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी होरपळून निघत होती. ऑक्टोबर पासूनच आस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हल, टूरिसम आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला बुश फायरचा जबरदस्त फटका बसला... बुशफायरमुळे अनेक प्राणी, माणसे मारली गेली आणि जंगले जळून खाक झाली. तो फटका फेब्रुवारी २० पर्यंत आटोक्यात येतो ना येतो तोच करोनाचं थैमान सुरु झालं. अशावेळी देशाची इकॉनॉमी थांबता कामा नये असं ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टरला वाटणं साहजिकच होतं.
पण लोकांच्या भावनांची भरती आणि ओहोटी पाहता सरकारने काही कठोर पावलं उचलत आता हळू हळू ऑस्ट्रेलिया स्थिरस्थावर व्हायचा प्रयत्न करतेय.
आधी लोकडाऊनच्या भीतीने लोकांनी सुपरमार्केट मधून गोणीच्या गोणी भरतील असे सामान नेले. टॉयलेट पेपरच्या मारामाऱ्यांनी तर सोशल मीडियावॉर ऑस्ट्रेलियनचं प्रचंड हसं झालं. दुकानात सामान मिळेना म्हणून काही नियम केले गेले. प्रत्येकाला २ पास्ता सॉस, १ टॉयलेट रोल, २ बाटली दूध असे निब्रंध बसले आणि सामान मिळायला लागलं.
आमच्या कामाच्या बाबतीतही नियम आहेत. ७०-८०% लोकांना घरातून काम करण्यासाठी सोयी पुरवल्या गेल्या आहेत. मुलांना सुद्धा शाळेकडून लॅपटॉप दिले गेलेत. त्यांचं शिक्षण गुगल क्लासरूमवरून चालतं. शिक्षक एक व्हिडीओ मधून अभ्यास पाठवतात मुलांनी तो करून गुगल क्लासरूम मध्ये सबमिट करायचा. अभ्यासपर्यंत ठीक आहे. पण मुलांच्या बाहेरील ऍक्टिव्हिटी बंद आहेत. ऑस्ट्रेलियाचा फुटी - सॉकरचा सिझन थांबलाय. आम्हाला फॅमिली ला बाहेर चालायला, सायकल चालवायला मुभा आहे. बॅकयार्डमध्ये फक्त फॅमिली मधली लोकं खेळू शकतात. बाकी सोशल डिस्टंसिंग पाळावे लागते. काही दिवसापूर्वी मेलबॉर्नला ५-६ भारतीय मित्र एकत्र येऊन घराबाहेर क्रिकेट खेळत होते. तर पोलीस आले आणि प्रत्येकाला १६०० डॉलरचा फाईन मारला.
सगळी दुकानं, झाडूवाला, प्लम्बर अगदी सगळ्या सेवा सुरु आहेत फक्त व्यवस्थित काळजी घेऊन. इथे सेवाभावी संस्था आणि इंडियन रेस्टारंट मात्र इंटरनॅशनल स्टुडंडसाठी मदतीचा हात देऊन आहेत. बऱ्याच जणांचे जॉब गेलेत त्यांना ग्रोसरी, जेवण विनामूल्य घरपोच पोहोचवलं जातंय. डिप्रेशन आणि मानसिक अस्वास्थ्यासाठी कौन्सेलिंगची सोय आहे. माणुसकीचं छान दर्शन पाहायला मिळतंय. झुंबा, योग, डान्स क्लास झूमवर घेतले जातायेत.
करोनाची दहशत तर आहेच पण काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे. घरात थांबून आपण करोनाला हरवू शकतो. पण खरं सांगू का? मी मुलांना नेहमी उपदेश द्यायचे आमच्या वेळी कसं होतं. पण ह्या करोनाच्या भीतीने का असेना घड्याळाच्या काट्यावर धावणारं जग विसावलंय आणि मी चक्क माझ्या मुलांबरोबर रोज सायकल चालवतेय, कॅरम खेळतेय, मुलांना कुकिंग शिकवतेय, आणि रामायणचा आनंद घेतेय...
सौ. इरा पाटकर, कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया
हा लेख लोकप्रभाच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

Comments
Post a Comment