असाही एक स्वातंत्र्यदिन......
तरी आज काहीतरी वेगळी सकाळ साठवायची होती म्हणून मी निघाले ते पण चक्क चालत... कुठे जायचंय असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरवायचं हि नसतं खरंतर... वाट फुटेल तिथे आणि पाय नेतील तिथे जायचा आज बेत आखला... सकाळी ७ ची वेळ होती... नुकतीच उजाडल्यासारखी... सुट्टीमुळे रस्ताही आळसावलेला होता... तुरळक टाळकी वावरत होती... त्यात पण २-३ रिक्षेवाले, एखादा दूधवाला सायकलवर आणि एखादा पेपरवाला तेवढा दिसला... बाकी त्या रस्त्याची शान असलेली एक दोन कुत्री इथे तिथे लोळत... अधून मधून एखादी स्कूटर किंवा गाडी जायची आणि त्यावर लावलेला तिरंगा दिमाखात माझ्याकडे बघायचा... म्हणायचा आज माझा दिवस आहे.. आणि मला मात्र हसू यायचं कि हा संध्याकाळ पर्यंत कुठे सापडेल ह्या विचारानं…
अचानक एका सुरात आवाज कानावर पडला, "भारत भाग्यविधाता... पंजाब सिंधू गुजराथ मराठा द्राविड उत्कल बंग... " आणि चालत चालतपावलं दगडी शाळेच्या बाहेर थांबली कारण देशाच्या नकाश्यावर कितीही वेड्या वाकड्या रेषा आपण माणसाने ओढून विभाजन केले तरीहीभाग्यविधात्या भारताच्या राष्ट्रगीतामध्ये तरी "अखंड भारत" घट्ट एकवटलाय हे सुखावतं मनाला... विचार करता करता एक टपरीवरचा चहाप्यावासा वाटला... आणि मला राष्ट्रगीतात हरवलेलं पाहून मग चहावाल्याच्या राजकीय ज्ञानाचा हि आस्वाद फुकट मिळाला. कारण आपल्यादेशात पॉलिटिक्स ह्या विषयावर सगळ्यांचीच पी. एच. डी. असतेच...
थोडं पुढं निघाले तर अजून एका शाळेची मुलंमुली गलका करून उभी होतीच शाळेच्या बाहेर. त्यातल्या काहींच्या हातात बक्षिसाचे कप मुरवतहोती आणि उगीच मुरडत होती.... त्या वयात मिळालेल्या बक्षिसाची एक वेगळीच मजा असते कारण त्या वयात आपल्या गुणांचं बक्षीस "मिळतं" नंतर मात्र बक्षीस फक्त "कमवायचंच" असतं...इन्क्रिमेंट आणि प्रमोशनच्या नावानं...
मी मात्र चालत चालत आपल्याच धुंदीत... आता गाड्यांची वर्दळ सुरु झाली आणि दुकानंही उघडायला सुरुवात झाली... दिमाखात गाड्यांवरूनमिरवणारे तिरंगे माझं आपापसात हितगुज सुरूच होतं कि... आणि अचानक एका दुकाना खालून जातांना एक जण ओरडला," ओ मॅडम, बोर्डउतरवतोय वरून; डोक्यात पडेल ना..." आणि मी जरा भानावर आले बघितलं तर तो वरून एक जुना दुकानाचा बोर्ड उतरवत होता जर तो बोर्डसुटला असता तर मी तर तिरंगा बघता बघता अनंतात विलीन सुद्धा झाले असते.. खरंच त्याला माझ्या डोक्याची किंवा जीवाची काळजी असेलकि उगीच मला काही झालं तर इंश्युरन्स आणि नसतं लष्टर त्याच्या आठी पडेल ह्याची काळजी असेल... असो पण मी त्याला थँक्यू म्हटलं आणिसॉरीही...
परत रस्त्याने दिसणाऱ्या गाड्या, स्कुटर आणि दिमाखात फिरणारे ते तिरंगे... नाकात मस्त वडापावचा वास शिरला आणि पावलं आपोआप तिथे वळली... पूर्वी शाळा सुटली किंवा मधल्या सुट्टीत आम्ही वडा पाव खायला गर्दी करायचो... आजही तसंच काहीसं करावंसं वाटलं... आमचा राजमाताचा वडापावना जगात भारी.. गरम गरम वडापाव आणि चहा घेऊन मी चक्क नाक्यावर बसून खात होते... हे असं मी काही १५-२० वर्षांनंतर परत एकदा केलं असेन... मस्त वाटत होतं इकडे तिकडे बघत वडापाव खाताना... मी त्या स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक ... वडापाव च्या दुकानात फाल्गुनी पाठकचं गाणं; चुडीजो खनके चालू होतं आणि मी मस्त रस्त्याची मजा बघत होते... रस्त्यात दिसणाऱ्या बायकाही आज तिरंगा ड्रेस घालून निघालेल्या...एक जैन माणूस त्याचं क्रीम रंगाचं सोवळं नेसून मंदिरात पूजेसाठी चाललेला अनवाणी.. मध्येच एक हातगाडी शांतपणे गाडी ओढत ओरडतोय "जुना भंगार दो रे बाबा" म्हणजे आता आम्ही काय जुनं टाकून नवीन घेऊन मिरवतोय... आम्ही विसरलोय त्या जुन्या स्वातंत्र्यवीरांना आणि त्या जुन्या स्वातंत्र्य मिळालेल्या दिवसाला कारण तुमच्या आमच्या वाढदिवसासारखा देशाचाही वाढदिवस दरवर्षी येतोच कि... आम्हाला नवनव्या पिकनिक, पार्टीची एक सोय आहे ती... असो एव्हाना चांदनीचं तेरे मेरे होठोपे गाणं सुरु झालं होतं...
मग मी पण निघाले चालत पुढे पुढे... आज हा रस्ता माझा सोबती आणि हा तिरंगा माझा सखा झाला होता... मी सुद्धा खुशीत होते आणि खाऊन सुखाऊन टुन्न चालत होते... मी मध्येच एका दुकानापाशी थांबले आणि काहीतरी वाचत होते तर एक म्हातारीशी बाई येऊन वीस रुपये मागायला लागली... खरंतर मला २० रुपये देणं काही फार मोठी गोष्ट नसूनहि मी तिला नाही म्हणाले... कधीतरी ऐकलं बघितलं होतं कि काही माणसं खाण्यासाठी औषधासाठी पैसे मागतात आपण दिले कि त्याची दारू पितात... मग पुढे जाऊन परत मागे वळून पाहिलं तर ती बाई इडलीवाल्याकडे हिरमुसून उभी होती... मी गेले तिच्याकडे आणि तिला विचारलं का गं पैसे मागत होतीस. सत्तरीच्या पुढची ती बाई; २-३ घरात धुनी भांडी करणारी होती आणि तिला पगार मिळाला नव्हता... हातावर पोट असलेली हि माणसं हा देश जेव्हा स्वतंत्र झाला असेल त्याची साक्षीदार आज पोटाचा खड्डा झालेली... मी तिच्या दोन वेळच्या खाण्याचे पैसे भरले आणि तिला काही खाणं बांधून दिलं... निदान एवढं तरी मी ह्या स्वतंत्र देशातल्या साक्षीदाराची करू शकत होते... आणि ती माझ्याकडे फक्त बघत होती... आम्ही दोघीही एकमेकांशी बोललो नाही मला तिचे आभार ऐकायचे नव्हते कारण ते शब्दच कुठेतरी मला आणि माझ्या आनंदी दिवसाला आज जखमी करून गेले असते. मी निघाले आणि चालत चालत पुढे जाताना एक रिक्षा भरधाव निघालेली तोच तिरंगा मिरवत आणि त्यात मोट्ठ्यानं गाणं वाजत होतं....
"ये जो देश हे तेरा... स्वदेश हे तेरा".........

Comments
Post a Comment